ऋषीची भाजी किंवा बडम

#ऋषीची भाजी
#बडम

गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ही भाजी केली जाते. मला पूर्वी ही भाजी नाही आवडायची.. कारण माहित नाही.. आणि कधी आवडायला लागली ते पण आठवत नाही. दर वर्षी शेजारच्या वहिनी द्यायच्या आठवणीने.. पण या वर्षी त्या अलिबागला असल्याने मला भाजी मिळेल असे वाटले नव्हते... पण मग मी विचार केला की आपण करून बघुया की.. नशिबाने जवळपास सगळ्या भाज्या मिळाल्या.. भेंडी मला आवडत नसल्याने मी घातली नाही 😉 .. 

लाल भोपळा, सुरण, बटाटा, रताळे - एक एक वाटी फोडी
अळू, लाल माठ, आंबडी - बारीक चिरून एक एक वाटी
अळूची देठ, लाल माठ देठ - एक एक वाटी
एक किंवा दोन कणसे तुकडे करून (आवडीनुसार)
ओले खोबरे 1 वाटी
हिरव्या मिरच्या 2 
थोडी कोथिंबीर
मीठ

आधी खोबरे मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.
मग एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल घालून तापत ठेवावे. तेल तापले की आधी सगळ्या पालेभाज्या आणि मग सगळ्या फळभाज्या.. मग खोबऱ्याचे मिश्रण आणि शेवटी कणसाचे तुकडे घालून छान परतून घ्यायचे.. चवीनुसार मीठ घालायचे.. थोडे पाणी घालायचे आणि 10 ते 15 मिनिटे मंद गॅसवर झाकून ठेऊन द्यायची.
15 मिनिटांनी बघायचे सगळ्या भाज्या शिजल्या आहेत ना.. यात फक्त सुरण थोडा उशिरा शिजू शकतो.. बाकी पटकन शिजतात सगळ्या.. तेवढे चेक केले की झाले. 

ह्या भाजीला जास्त वेळ लागत नाही आणि ही एकदम पौष्टीक भाजी आहे. अगदी थोड्या तेलात करतात. 

ही भाजी नुसती पण छान लागते. पण ज्यांचा उपास असतो ते वरी तांदूळ बरोबर ही भाजी खातात.. किंवा तांदुळाची भाकरी हा पण एक चांगला पर्याय आहे त्या बरोबर खायला.. अतिशय पौष्टिक अशी ही भाजी खरंच खूप छान लागते..

ह्यात अजून कच्ची केळी, पावट्याचे दाणे, शेंगदाणे, भेंडी, चवळीच्या शेंगा, घोसाळे अश्या भाज्या पण घालतात..प्रत्येकाच्या आवडी नुसार करतात. 

Comments

Popular posts from this blog

पौष्टीक लाडू

लिंबाच्या सालीचे गोड लोणचे