आंबोळी ... थोडी वेगळी

आंबोळ्या बऱ्याच घरी होतात.. प्रत्येकीची पद्धत वेगळी.. मापे वेगळी... 

मी खालील प्रमाणे घेतले प्रमाण:
2 वाट्या जाड तांदूळ
1 वाटी उडीद डाळ  ( इथे अर्धी वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी मुगडाळ घेतली तरी चालते)
हे दोन्ही एकत्र करून धुवून थोड्या पाण्यात भिजत ठेवायचे. 
अर्धी वाटी पोहे ( कोणतेही) भिजवून धुवून डाळ तांदूळात मिक्स करायचे.
अर्धा चमचा मेथी दाणे घालायचे.

हे सगळे साधारण 5 तास भिजले की कमीत कमी पाण्यात मिक्सर मधून बारीक करून ठेवायचे. मोठ्या भांड्यात ठेवावे म्हणजे फुगून आले तरी त्याला पुरेशी जागा असेल भांड्यात.  रात्रभर ठेवावे म्हणजे चांगले फुलून येते.

सकाळी त्यात थोडे मीठ घालून थोडे पाणी घालून पीठ हलवून नीट करून घ्यावे. नॉन स्टिक किंवा लोखंडी तव्यावर जाडसर पसरवून दोन्ही बाजूने छान भाजून घेऊन चटणी बरोबर खायची.

मी  यावेळेस नुसत्या आंबोळ्या ना घालता त्यात कांदा, हिरवी मिरची कोथंबीर बारीक चिरून घातली.. आणि मग त्याच्या आंबोळ्या केल्या.. ह्या नुसत्या दही किंवा लोणी बरोबर छान लागतात... चटणी नसली तरी धावते.. 😄😄 मी केली होती चटणी पण आपले सांगते.. 

यात अजून गाजर किसून, एखादी पालेभाजी बारीक चिरून घातली की छान पौष्टीक असा नाश्ता किंवा कधीतरी जेवण म्हणून सुध्धा बेत चांगला होऊन जातो.

बघा तर मग करून... सोप्प्या आहेत .. जमतील आरामात.. 

👍👍👍👍👍👍👍👍👍

Comments

Popular posts from this blog

पौष्टीक लाडू

लिंबाच्या सालीचे गोड लोणचे

ऋषीची भाजी किंवा बडम