मूगडाळ आप्पे आणि वाटी ढोकळा...


आज आपण मुगडाळी पासून बनवलेले तीन पदार्थ बघणार आहोत. एकदाच तयारी करून घेऊन तिन्ही पदार्थ बनवता येतील.. आणि तसे पटापट होतात..ना तेलकट ना जास्त तिखट..  पाहुणे येणार असतील तर त्यांच्या साठी खास .. पोटाला त्रास न देणारे आणि त्यात लहान मुलांना सुध्दा आवडतील असे आहेत. चला तर मग बघुया कसे करायचे ते...

एक वाटी पिवळी मुगडाळ 4 ते 5 तास स्वच्छ धुवून मग थोडे पाणी घालून भिजत ठेवायची. पाणी खूप घातले तर जास्तीचे पाणी फेकून द्यावे लागते आणि त्यातून डाळीचे सर्व सत्व निघून जाते.. मधूनच हवे तर बघायचे की डाळ कितपत फुगली आहे.. पाणी कमी वाटले तर थोडे वाढवायचे..  

आता आपल्याला एक मिश्रण बनवून घ्यायचे आहे.. 
त्या साठी कांदा, कॉर्न, गाजर, भोपळी मिरची, पनीर, उकडलेला बटाटा, फरसबी, फ्लॉवर, मटार... ज्या भाज्या असतील त्या घ्यायच्या...  सगळ्या आपल्या आवडी प्रमाणे एकत्र करून त्यात मिरी पावडर, लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स, आमचूर पावडर, कोथिंबीर, चाट मसाला .. ( पाव भाजी मसाला किंवा तत्सम रेडी मसाला सुध्दा चालेल) घालून अर्ध्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. 

डाळ 5 तास भिजल्यावर त्यात जर का पाणी राहिले असेल तर ते आधी काढून घ्यायचे आणि ती डाळ मिक्सर मधून एकदम बारीक करून घ्यायची... आवश्यक वाटले तर पाणी घालायचे..

ह्या मिश्रणाचे 2 भाग करून एक भाग एका भांड्यात घेऊन त्यात मीठ आणि थोडी हळद घालून छान एकत्र करायचे. 2 3 मिनिटे चांगले फेटून घ्यायचे.. जेणे करून ते एकदम हलके होईल.मग आप्पे पॅन घ्यायचा.. त्यात थोडे थोडे तेल घालून तो गॅस वर ठेवायचा.. आता ह्या मिश्रणात थोडा eno घालायचा... आणि थोडे फेटून घ्यायचे.  मग आप्पे पॅन मधल्या प्रत्येक साच्यात थोडे थोडे हे बॅटर घालायचे... मग एक एक गोळा त्या मिश्रणाचा घालायचा आणि परत त्यावर थोडे बॅटर घालायचे... आणि झाकून ठेवायचे. गॅस मंद ठेवायचा.. थोड्या वेळाने चमच्याने ते एक एक करून परतवून दुसऱ्या साईड ने सुध्दा छान रंग येई पर्यंत मंद गॅस वरच परतवून घ्यायचे आणि मग सॉस किंवा हिरव्या चटणी बरोबर गरम गरम सर्व्ह करायचे.. 

आता उरलेले मूगडाळीचे पीठ घेऊन त्यात आले लसूण मिरची पेस्ट आणि मीठ घालुन फेटून घ्यायचे.. हळद घातली तरी चालेल.. 
गॅस वर एक कढई ठेऊन त्यात पाणी घालून एक स्टँड ठेवायचा आणि कढई  झाकून गरम करायला ठेवायची. हे गरम होई पर्यंत 4 वाट्या घ्यायच्या .. त्याला आतून तेल लावायचे..
डाळीच्या पिठात eno घालून ते हलके मिक्स करून घेऊन दोन वाट्या अर्ध्या भरायच्या.. आणि दुसऱ्या दोन वाट्या पाव पाव भरायच्या.. ह्या 2 वाट्या मध्ये ते भाज्यांचे मिश्रण घालायचे आणून परत थोडे थोडे डाळीचे पीठ त्यावर घालून  ते मिश्रण पूर्ण बुडेल असे घालायचे.. 
आता कढईमध्ये पाणी चांगले उकळले असेल.. गॅस बारीक करुन त्या स्टँड वर एक ताटली ठेवायची आणि त्या वर ह्या 4 वाट्या ठेवायच्या.. झाकण ठेवायचे आणी 15 मिनिट्स चांगली वाफ येऊ द्यायची.... 15 मिन नंतर झाकण काढून त्यात टूथपिक घालून बघायचे.. जर का टूथपिक तशीच बाहेर आली तर समजायचे आपला ढोकळा व्यवस्थित झाला

वाट्या बाहेर काढून थोड्या गार करायच्या आणि मग एका ताटली मध्ये हे वाटी ढोकळे काढून त्यावर छान फोडणी घालून छान चटणी बरोबर सर्व्ह करायचे..

कसे वाटले हे 3 मेनू? एकदम मोजक्या सामानात 3 3 प्रकार... 

मधले स्टफ्फिंग आपल्या आपल्या आवडी प्रमाणे करायचे.. प्रत्येकाची चव वेगळी.. ज्यांना नॉनव्हेज हवे त्यांनीं कोण वेग स्टफ्फिग सुध्दा घातले तरी चालेल.. करून बघायला काय हरकत आहे एक प्रयोग.. नाही का.. मी नाही केले अजून कधी .. पण डोक्यात कल्पना आली.. 

चला तर मग करून बघा आणि कळवा मला.

😊😊😊😊

Comments

Popular posts from this blog

पौष्टीक लाडू

लिंबाच्या सालीचे गोड लोणचे

ऋषीची भाजी किंवा बडम