अंबाडीची भाजी

अंबाडीची भाजी 😍😍😋😋

अंबाडीची भाजी आणि भाकरी हे एक अतिशय सुंदर असे समीकरण आहे . गरम गरम भाकरी.. त्याबरोबर ही भाजी .. त्यावर लसूण लाल मिरचीची फोडणी...

आहा हा...

तशी ही भाजी सोप्पी आहे करायला फक्त ही भाजी नेहेमी मिळतेच असे नाही.

परवाच भाजीवाली कडे बघितली आणि घेतली लगेच.. त्याच दिवशी निवडून ठेऊन दिली... काल राखी पौर्णिमा होती म्हणून नाही करता आली. मग आज लगेच बेत ठरवूनच टाकला. 

प्रथम अंबाडी ची पाने पाणी न घालता कूकर मध्ये 2 शिट्या काढून शिजवून घेतली. तसेच तांदूळ आणि तूरडाळ एकत्र करून शिजवून घेतली. तांदूळ कण्या असतील तर जास्त चांगले.. मी माझे रोजचे इंद्रायणी तांदूळ घेतला.. हे शिजवताना त्याचा लगदा होणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे डाळ शिजली पाहिजे पण मोडली नाही पाहिजे अशी... 

शिजवलेली अंबाडी चांगली स्मॅश करून घेतली. ती 1 वाटी असेल तर डाळ तांदूळ (शिजलेले) 2 वाट्या घेते मी. 

आता फोडणी करून त्यात लाल मिरची, लसूण ठेचून, थोडे शेंगदाणे, कढीपत्ता, हळद आणि थोडे लाल तिखट लसूण छान खरपूस होई पर्यंत परतवून घ्यायची.. मग त्यात शिजवलेली अंबाडी घालून छान परतवून घ्यायची. नंतर त्यात डाळ तांदूळ घालून चवी पुरते मीठ घालून एकत्र करायचे... थोडे पाणी घालून मिक्स करायचे आणि एक वाफ काढायची. मग चव घेऊन आंबट पणाचा अंदाज घेऊन थोडा गूळ घालायचा.. 

पानात वाढून घेताना त्यावर लाल मिरची लसूण ची चुरचुरीत फोडणी करून घालायची आणि गरम गरम भाकरी बरोबर खायची. घरचे लोणी असेल तर मग काय बहारच म्हणायची... 

स्टेप बाय स्टेप कृती चे फोटो टाकले आहेत.. त्यावरून अंदाज येईलच.. 

🙏🙏

Comments

Popular posts from this blog

पौष्टीक लाडू

लिंबाच्या सालीचे गोड लोणचे

ऋषीची भाजी किंवा बडम