रसवाला खमण (गुजराती डिश)

रसवाला खमण ही एक गुजराथी डिश आहे. मला सगळ्या गुजराथी आणि साऊथ इंडियन डिश खायला  आवडतात आणि करायला सुध्दा आवडतात.. 
Lockdown मधे मला नवीन नवीन पदार्थ करायला खूप वेळ मिळाला.. 
ह्या डिशला तसा बराच वेळ लागतो करायला पण खायला मात्र काही मिनिटे पुरतात..

चला तर मग बघुया कशी करतात ते..

*वाटी डाळ खमण*
एक वाटी मुगडाळ
पाव वाटीला थोडी कमी चणाडाळ
2 ते 3 हिरव्या मिरच्या
एक इंच आल्याचा तुकडा
हळद, मीठ, तेल

*रस्सा*
2 चमचे तूरडाळ
1 चमचा मुगडाळ
1/2 चमचा उडीदडाळ
1/2 चमचा चणाडाळ
3 लवंग 3 मिरी .. छोटा दालचिनीचा तुकडा
मीठ मसाला तिखट हळद गरजे नुसार

सलाड (toppings)
1 कांदा बारीक चिरून
1 टोमॅटो बारीक चिरून
1 काकडी बारीक चिरून
थोडा कोबी बारीक चिरून
बारीक शेव आणि कोथिंबीर
डाळिंब दाणे असले तर ते पण चालतील

आदल्या दिवशी रात्री दोन्ही डाळी स्वच्छ धुवून भिजत ठेवायच्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातले पाणी काढून त्या मिक्सर मधून दरदरीत वाटून घ्यायच्या. वाटतानाच त्यात मिरची आले मीठ साखर आणि तेल घालून मिक्स करायचे. मग हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात थोडी हळद घालून चांगले हलवायचे.. साधारण 4 ते 5 मिनिटे.मग त्यात एक चमचा खायचा सोडा घालायचा आणि परत मिक्स करायचे. आणि हे मिश्रण साधारण 4 ते 5 तास बाजूला ठेऊन द्यायचे.
4 ते 5 तास झाले गॅस इडली स्टँड, ढोकळा स्टँड, कूकर ज्यात तुम्हाला ढोकळा करायचा आहे ते भांडे पाणी घालून झाकून पाणी गरम करायला ठेवायचे. ह्या मिश्रणात एक चमचा इनो घालून ते चांगले हलक्या हाताने फेटून घ्यायचे. ज्या भांड्यात ढोकळा करणार त्याला आतून तेल लावून घ्यायचे आणि मग त्यात ते मिश्रण घालून ते भांडे गरम करायला ठेवलेल्या भांड्यात ठेवायचे. 15 मिनिटे चांगली वाफ काढायची.
15 मिन झाली की टूथपिक ने चेक करायचे ढोकळा झाला की नाही.. झाला असेल तर गॅस बंद करून झाकण काढून ढोकळा गार व्हायला ठेवायचा.

आता आपले खमण तयार झाले. आता त्याची डाळ तयार करूया. त्यासाठी वर दिलेल्या डाळी एकत्र करून त्यात लवंग मिरी आणि दालचिनी सगळे घालून कढई किंवा frypan मध्ये भाजून घेऊया. आणि ते गार झाले की मिक्सर मधून बारीक पावडर करून घेऊया. ती पावडर पाण्यात घालून त्याचे पातळ मिश्रण करून घ्यायचे. खूप पातळ नाही.. खूप घट्ट पण नाही..
कढई मध्ये फोडणी करायची. त्यात मोहरी जिरे हिंग हळद लाल तिखट कढीपत्ता सगळे घालून मग हे पाण्यात कालवलेले पीठ घालायचे.मीठ घालायचे. साखर घालायची आणि सतत ढवळत राहायचे. आपण पीठ करून घेतल्यामुळे हा रस्सा एकदम एकजीव होतो.. ह्या डाळी कुकरला शिजवून पण हे करता येते पण मला ही पद्घत आवडली. पीठ हळू हळू शिजायला लागले की कितपत घट्ट होतेय ते बघून पाणी घालायचे. चव घ्यायची आणि काही कमी जास्त असेल तर ते घालायचे. हा रस्सा तसा तिखट असतो पण आपल्या घरी जशी चव आवडते तशी ठेवावी.

आता सलाड ची तयारी करूया. वर सांगितलेले सगळे पदार्थ एकत्र करून त्यात चाट मसाला, मिरी पावडर घालून एका भांड्यात ठेवायचे.

आता डिश तयार करायला घ्यायची. 

आधी गार झालेला ढोकळा कापून घ्यायचा.एका डिश मध्ये एका साइडला ढोकळा हाताने बारीक करून पसरवायचा. मग त्यावर सलाड घालायचे.. मग दुसऱ्या साइडला रस्सा... मग बारीक शेव आणि कोथिंबीर.. डाळिंबाचे दाणे असतील ते पण छान लागतील... अशी डिश सजवून मस्त सर्व्ह करायची.. घरातले सगळे कसे एकदम खुश होतील बघा.. 

ही डिश दोन प्रकारे सजवता येते.. दोन्ही फोटो टाकले आहेत. 






 

Comments

Popular posts from this blog

पौष्टीक लाडू

लिंबाच्या सालीचे गोड लोणचे

ऋषीची भाजी किंवा बडम